निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.

निवडणूक जवळ आल्याने आघाडी आणि युतीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शांत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मनसे काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. मनसेचे कार्यालय राजगड येथे राज ठाकरेंनी ही बैठक बोलवली आहे.

दरम्यान, यापूर्वी मनसे नेत्यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रतिक्रिया राज ठाकरेंनी जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आता विभागप्रमुखांना भेटून राज ठाकरे निवडणुकीबाबतची चाचपणी करत आहेत. मात्र मनसे निवडणूक लढणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.