समीर वानखेडे यांची एनसीबीमधून बदली,समोर आले आहे हे कारण

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस क्रूज वरील पार्टीमध्ये अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व त्याच्या मित्राला एन सी बी ने टाकलेल्या छाप्यात पकडण्यात आले होते. यानंतर या दोघांची रवानगी तुरुंगामध्ये करण्यात आली होती. सव्वीस दिवस हे दोघेही तुरुंगात होते .यावेळी एन सी बी ने आर्यन खानला जामीन मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले .यासाठी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सुद्धा देण्यात आली .
एनसीबीने केलेल्या कारवाईचे प्रमुख व एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर आर्यन खान आणि शाहरुख खान इतकेच प्रसारमाध्यमांमध्ये समीर वानखेडे यांचे नाव सुद्धा झळकत होते .समीर वानखेडे हे सेलिब्रिटींना ड्रग्स प्रकरणांमध्ये नेहमीच गुंतवतात असा आरोप सुद्धा अनेकांनी केला. समीर वानखेडे यांच्या आर्यन खान प्रकरणातील भूमिकेबद्दल काहींनी प्रश्नचिन्ह उभे केले तर काहींनी त्यांना पाठिंबा सुद्धा दिला. समीर वानखेडे यांची एनसीबीमधून बदली करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय झाले आहेत.
वानखेडे यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनी एनसीबी मध्ये कार्यभार वाढविण्या साठी मुदतवाढ मागितलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे वानखेडे यांची दुसऱ्या विभागामध्ये बदली करण्यात आली आहे.एनसीबी मध्ये कार्यकाळ स्वीकारल्यानंतर समीर वानखेडे यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी कारवाई केली होती .
सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर समीर वानखेडे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर रिया चक्रवर्तीपासून अनेक हायप्रोफाईल सेलिब्रिटींना त्यांनी या प्रकरणी समन्स बजावले होते. या अगोदर एअर इंटिलिजन्स विभागामध्ये उपायुक्त म्हणून काम करताना समीर वानखेडे यांनी खूप उत्कृष्ट काम केले होते .त्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी गृहमंत्री पदक सुद्धा बहाल करण्यात आलेले आहे .
आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे .या प्रकरणात विनाकारण आर्यन खानला गोवून शाहरुख खान कडून मोठ्या किमतीची खंडणी वसूल करण्याचा समीर वानखेडे यांचा कट होता असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी खोटे जात प्रमाणपत्र दाखवून समीर वानखेडे यांनी आपली शासकीय नोकरी मिळवल्याचे आरोप केले आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली असून यामध्ये त्यांना निर्दोष सोडण्यात आले आहे.