सर्वोच्च न्यायालयाचा रियाला झटका; सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास सीबीआयकडे

सर्वोच्च न्यायालयाचा रियाला झटका; सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास सीबीआयकडे
‘काय पो चे’ सिनेमातून आपले अभिनय कौशल्य सुशांत सिंह राजपूतने अख्या जगाला दाखवून दिले. किस देश में है मेरा दिल, पवित्र रिश्ता या मालिकांमध्ये काम करून पुढे आलेला एक चेहरा आपल्या अभिनयातून इतका पुढे जातो हे नक्कीच कौतुकास्पद असते. मात्र, तसे न होता त्याला नेपोटीझमचा सामना करावा लागला. तरी तो आपली वाट चालत राहिला. दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शनाच्या जवळ होता, २ कंपन्यांचे काम व्यवस्थित सुरु होते. फिजिक्सची आवड असलेला सुशांत आपली आवड जोपासत होता. तारे, चंद्र, मंगळ याची ओढ असताना, त्याने चंद्रावर जागा घेऊन सगळ्यांना अवाक केले होते.
सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी वांद्र्याच्या त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूनंतर जगभरातून विज्ञान वेडे आणि अगदी नासा सुद्धा शोक व्यक्त करत होते आणि तेव्हा आपल्याला त्याच्यातील एक व्यक्ती म्हणून असणारे गुण कळले. व्यक्ती जिवंत असताना आपल्याला त्याची किंमत नसते आणि तो गेल्यावर मात्र त्याच्याबद्दलचं सगळं चांगलं दिसायला लागतं.
त्याच्या मृत्यूला आत्महत्या समजून आतापर्यंत अनेक तपास झाले; मात्र त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केल्यापासून या प्रकरणाला वेगळे वळण आले. त्याच्या अकाउंटमधून तब्बल १५ कोटी गायब झाले आणि त्याच्या कथित दोन कंपन्यांवर रिया व तिचा भाऊ डायरेक्टर या बाबी खटकणाऱ्या होत्या. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे सुद्धा नाव गोवले गेले. त्याच्या मृत्यूच्या रात्री झालेल्या पार्टीमध्ये आणि दिशा सालियन या त्याच्या मॅनेजरच्या आत्महत्येच्या मागे आदित्य ठाकरे तर नाहीत ना, अशा चर्चांना राजकीय पातळीवर उधाण आले. यात तेल घातले ते महाराष्ट्र शासनाच्या सीबीआय चौकशीला केलेल्या विरोधाने.
आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात मुंबई पोलीस कि पाटणा पोलीस हा वाद बाजूला सारत, सीबीआयकडे हा तपास सुपूर्त केला आहे. या प्रकरणातील हा सर्वात मोठा निर्णय आहे. सुशांत असा अचानक निर्णय घेऊ शकत नाही. हे विधान त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिने केले होते. तो आत्महत्या करणार नाही यावर त्याचे मित्र आणि परिवार ठाम होते. त्याचे फॅन्स आपला आवडता अभिनेता कशाने गेला हे जाणून घेण्यासाठी सीबीआयची मागणी करत होते. त्यातच सुशांतच्या घरच्यांनी सुद्धा सीबीआयची मागणी केली. मात्र, यात महाराष्ट्र शासन विरोधात असताना दिसत होते. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुद्धा यात सीबीआय तपास व्हावा अशी मागणी सुरवातीला केली होती. मात्र, कोर्टात प्रकरण गेल्यावर तिने अचानक तिचे शब्द फिरवून हा तपास मुंबई पोलिसांनी करावा अशी मागणी केली होती.
ईडीने तिची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. तिचे उत्पन्न आणि तिचा खर्च याचा मेळ लागला नाही. तिच्या भावाचे खर्च आणि तिचा खर्च सुशांत का उचलत होता याचेही उत्तर दोघांकडे नव्हते. यातून तिची आणि सुशांतची सी ए श्रुती हिने सुशांतला रियाने फसवून पैसे वापरले हे मान्य केले आणि आपण साक्ष द्यायला तयार आहोत हेही ईडी समोर सांगितले. याने रियाच्या अडचणीत आधीच वाढ झाली होती. सोशल मीडियातून तिच्यावर होणारी चिखलफेक, तिचे घरातून गायब होणे, बिहार पोलीस तिच्या घरी गेल्यावर ती तिथे नसणे हे सर्व संशय निर्माण करणारे होते. सुशांतने आपल्या मोठ्या बहिणीच्या नावावर केलेली साडे चार कोटींची एफडी आणि त्यातून अडीच कोटी अचानक वेगळ्याच खात्यावर जाणे हे सगळे रियाकडे संशयाची सुई फिरवत होते.
आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या घरच्यांना समाधान देणारा आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी आपला मुलगा, भाऊ गमावणे हे खूप कठीण असते. याचे दुःख कधीही कमी होणारे नाही. मात्र, हि आत्महत्या होती तर ती त्याने का केली आणि ती हत्या असेल तर ती कोणी केली व का याचे उत्तर घरच्यांना मिळायलाच हवे. सुशांत सिंहचे वकील विकास सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार, कोर्टाने हा निकाल देताना इतर कोणताही एफआयआर जो या प्रकरणात दाखल झाला आहे, त्याचा तपास सुद्धा सीबीआय करेल असे स्पष्ट केले आहे. प्रत्येक मुद्यात सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची बाजू सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरली आहे. या सीबीआय तपासात मुंबई पोलिसांनी सीबीआयला सर्व मदत करावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत