ड्रग्सविश्वाचे धगधगते वास्तव जाणून घेण्यासाठी हे पाच चित्रपट नक्की पहा!

ड्रग्सविश्वाचे धगधगते वास्तव जाणून घेण्यासाठी हे पाच चित्रपट नक्की पहा!
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंगने नैराश्यातून आयुष्य संपवल्यानंतर त्याची हत्या झाली कि त्याने स्वतःच त्याचे आयुष्य संपवले याविषयी तर्कवितर्क सुरु आहेत. अशातच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतला दररोज ड्रग्जचे डोस देऊन त्याला मृत्यूच्या दारात ढकलले असे आरोप करण्यात येत आहेत. सीबीआय तपासात रियाने अनेक ड्रग्जमाफियांशी संपर्क केला असल्याचे तपासात उघड केले आहे.
मात्र यानिमित्ताने बॉलिवूडचे अंडरवर्ल्ड तसेच ड्रग माफियांशी संबंध असल्याची दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरु आहे. ड्रग्स अर्थात अमली पदार्थ, माफियांमार्फत बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींना पुरवले जात असल्याच्या शंकेला वाव आहे. बॉलिवूडमधील काही चित्रपटांमधून ड्रग्सविश्वाचे धगधगते वास्तव दाखविण्यात आले आहे. याच चित्रपटांविषयी आजच्या लेखात आपण याविषयी माहिती घेणार आहोत.
जांबाज : या चित्रपटामध्ये अनिल कपूर, फिरोज खान, डिंपल कपाड़िया आणि श्रीदेवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये फिरोज खान यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचा रोल साकारला होता जो ड्रग्सच्या दुनियेविरोधात संघर्ष पुकारतो. हा चित्रपट 1986 साली आला होता.
फॅशन : मधुर भंडारकर हा आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडतो हे आपण जाणतोच. चित्रपट आणि फॅशन इंडस्ट्रीशी ड्रग्सचे कसे जवळचे नाते आहे हे दाखवणारा फॅशन चित्रपट डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारा आहे. २००८ साली आलेल्या या चित्रपटामध्ये प्रियंका चोपड़ा, कंगना रनौत आणि मुग्धा गोडसे यांची प्रमुख भूमिका होती.
देव डी : ‘तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार’ हे गाणं ऐकलं तरी देव डी चित्रपटाची हमखास आठवण येते. 2009 साली आलेल्या या चित्रपटामध्ये अभय देओलने मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटात फिल्मी जगत आणि त्यावर असलेला ड्रग्सचा प्रभाव हे चित्रण दाखवण्यात आले होते.
दम मारो दम : 2011 साली आलेल्या रोहन सिप्पी दिग्दर्शित दम मारो दम या चित्रपटानेदेखील ड्रगच्या दुनियेची काळी बाजू दाखवली होती. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, राणा दग्गुबती, बिपाशा बासु आणि प्रतीक बब्बर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
उडता पंजाब : ड्रग्जचे विश्व आणि त्याची देशाच्या सीमेवरून होणारी तस्करी दाखवणारा अलीकडच्या काळातील चित्रपट म्हणजे उडता पंजाब हा होय. शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.