पेन विकून दिवसाला ५ रुपये कमावणारा आता कमावतोय करोडो रुपये, जाणून घ्या जॉनी लिव्हर थक्क करणारा जीवन प्रवास

गल्लोगल्ली जाऊन पेन विकणारा ‘जॉन प्रकाश राव जनुमाला’ असा बनला बॉलिवूडचा जॉनी लिव्हर
जॉन प्रकाश राव जनुमाला हे जॉनी लिव्हर चे खरे नाव. ६ भावंडात जॉनी मोठे आणि मागे ३ बहिणी व दोन भाऊ. वडील प्रकाश राव जनुमाला यांच्या पोटी जॉनी यांचा जन्म आंध्रप्रदेशमध्ये झाला. त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजे “चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत” अशी होती. वडील हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये कामाला होते. त्यांचा पगार इतका तुटपुंजा की, घरखर्च भागवणेदेखील मुश्किल होते.
त्यात पोटी ६ लेकरं. संसार मोठा होत होता तश्या अडचणी देखील आकार वाढवत होत्या. जॉनी यांना वडिलांची ओढाताण दिसत होती. त्यांना ही परिस्थिती पाहवत नव्हती. त्यांनी ७ वी नंतर शिक्षण थांबवायचे ठरवले. ७ वी नंतर शिक्षण थांबवून त्यांनी पेन विकायला सुरवात केली. गल्लोगल्ली बॉलीवुड मधील हिरोची मिमिक्री करून ते पेन विकत. त्याने झाले असे की त्यांच्यातील कला त्यांना कळाली आणि लोक त्यांना स्टेज शो साठी बोलवायला लागले. काही दिवसांनी वडिलांनी त्यांना हिंदुस्तान युनिलिव्हरमध्येच कामाला लावले.
पेन विकून दिवसाचे ५ रुपये मिळत, त्याहून हा जॉब चांगला होता. वर स्टेज शो मिळत असत. इथे काम करताना त्यांना जॉनी लिव्हर हे नाव मिळाले. कारण कंपनीचे नाव हिंदुस्थान युनिलिव्हर आणि त्यात तिथेही कर्मचारी त्यांच्या मिमिक्रीचे दिवाने होते.
नशिबाला त्यांचे हे काम मान्य नव्हते. एक स्टेज शो त्यांचे आयुष्य बदलेल असे कोणालाही वाटले नसेल. एका स्टेज शो ची सुपारी त्यांना मिळाली. त्यांनी तो केला आणि तिथे प्रमुख पाहुणे होते सुनील दत्त. सुनील दत्त यांनी “दर्द का रिश्ता” या सिनेमात त्यांना काम दिले. आणि नंतर कधीच जॉनी यांनी मागे वळून पाहिले नाही.
आज जॉनी लिव्हर हे इंडस्ट्री मधील मोठे नाव आहे. त्यांच्या विनोदाने आपण पोट दुखेपर्यंत हसलो आहोत. इमोशनल सीन्सने ढसाढसा रडलो आहोत. आज त्यांचा वाढदिवस! त्यांना अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवण्याचे देव सामर्थ्य देवो! कष्टातून वर येणाऱ्या लोकांसाठी त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे!