अधिक मास का आहे जावयांसाठी खास ? जाणून घ्या धोंडयाच्या महिन्याचे महत्व

अधिक मास का आहे जावयांसाठी खास ? जाणून घ्या धोंडयाच्या महिन्याचे महत्व

भारत हा सण आणि उत्सव यांनी भरलेला देश आहे. आपल्या देशात प्रत्येक महिन्यात एक तरी सण असतोच आणि त्या सणाचे एक वेगळेच महत्व असते. तो सण साजरा करण्याची एक वेगळी पद्धत असते एक रीत असते. सर्वात महत्वाचे म्हणजे  प्रत्येक सण -उत्सवाचे एक वेगळे वैज्ञानिक महत्व देखील आहेत. आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत अधिक मासाचे महत्व आणि अधिक मास जावायांसाठी का खास असतो. आपले ऋतु हे सूर्यावर तर आपले सण -उत्सव हे चंद्राच्या गतीवरून ठरविले जातात. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा ताळमेळ घातला जातो आणि सण -उत्सव हे ऋतु प्रमाणे साजरे केले जातात.  अधिक मासाला मल मास किंवा धोंडयाचा महिना किंवा पुरुषोत्तमं मास देखील म्हटले जाते. अधिक मास हा दर तीन वर्षानी येतो. हिंदू पंचगानुसार दर तीन वर्षांनंतर एक महिना जादाचा येतो म्हणजे 13 वा महिना त्यामुळे त्या महिन्याला अधिक मास म्हणतात. अधिक म्हणजे जादाचा महिना. पृथ्वीला सूर्याभोवती एक  प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस, 5 तास48 मिनिटं व 46 सेकंद लागतात यालाच सौर वर्ष म्हणतात

तर चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी  354 दिवस, 8 तास, 48 मिनिटं आणि 34 सेकंद यालाच चंद्रवर्ष म्हणतात. चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा अकरा दिवसाचा फरक जास्त वाढू नये याकरता अधिक महिना ग्राह्य धरला जातो. चांद्रवर्षातील एक महिना अधिकचा पकडला जातो आणि त्यालाच अधिक मास म्हणतात. अधिक मास हा 32 महीने 16 दिवस आणि 4 घटके नंतर येतो. अधिक मासात शक्यतो लग्न , मुंज असे कार्यक्रम केले जात नाहीत. या महिन्यात दान धर्म जास्त  प्रमाणात केला जातो.या महिन्याबद्दल असे देखील म्हंटले जात तुम्ही जितके दान कराल त्याच्या दुप्पट तुमची वृद्धि होते , त्यामुळे दानाला विशेष महत्व आहे.  अधिक महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही. या महिना जादाचा म्हणजेच अधिकचा असल्यामुळे या महिन्याला कोणताच स्वामी नसतो , त्यामुळे भगवान विष्णु यांनी या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आहे. भगवान विष्णूचे एक नाव हे पुरुषोत्तम असल्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते.अधिक मासात  मनात योग्य धारणा धरावी . मुखी भगवंताचे नाम स्मरण करावे. जास्तीत जास्त दान करावे आणि योग्य ते चिंतन करावे.

जावयास का केले जाते धोंडे दान – अधिक मासात मुलगी आणि जावयास धोंडे दान केले जाते. धोंडे दान म्हणजे नेमके काय आपण ते जाणून घेऊ या. वरती सांगितल्या प्रमाणे या महिन्यात विष्णु हा या महिन्यांचा स्वामी असतो. त्यामुळे विष्णूची पूजा केली जाते. मुलगी आणि जावई हे लक्ष्मी – नारायण म्हणून ओळखले जातात. म्हणजेच काय तर मुलगी आणि जावई हे भगवान विष्णु आणि लक्ष्मीचा च अवतार आहे असे समजून जावई आणि मुलीस धोंडे दान केले जाते. चांदीच्या  किंवा  तांब्याच्या तबकात   तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. तांब्याचा दिवा लावून तो जावयला देतात.जर अनारसे नसतील तर जाळीदार पदार्थ म्हणजेच  बतासे किंवा म्हैसूरपाक देखील दिला जातो. पुरणाचे दिंड केले जातात त्याला धोंडे म्हटले जाते आणि ते जेवणासाठी केले जातात. जर मुलगी नसेल तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा ब्राह्मणांस जेवू घातले जाते. अशा प्रकारे अधिक मास साजरा केला जातो. अधिक मास म्हणजेच काय तर आपल्या जवळच्या लोकांशी आणखी नातं घट्ट व्हाव सर्वानी एकत्र याव सुख – दुख वाटून घ्यावी , एकमेकाना सांभाळून घ्यावे यासाठी अधिक  म्हणजेच जादाच वेळ आणि महिना होय आपण त्यांचा सदुपयोग करून घ्यायला हवा. 

Being Marathi