रामायणमधील सीतेने बोलून दाखवली दखल न घेतल्याची खंत

कोरोना वर मात करण्यासाठी व कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी जगभरातील सर्व देशांनी अवलंबलेल्या लाँक डाऊनमुळे वेगवान गतीने धावणाऱ्या या जगाला सक्तीने घरामध्ये थांबावे लागले. लाँकडाऊन मधील रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे अनेक निरनिराळे फंडे लोकांनी शोधून काढले. या काळात मनोरंजनाचे निरनिराळे पर्याय ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होते.
लोकांच्या रिकाम्या वेळेमध्ये त्यांचे घरात मनोरंजन व्हावे या उद्देशाने भारत सरकारने सुद्धा ऐंशीच्या दशकातील दूरदर्शन वरील गाजलेल्या रामायण, महाभारत यांसारख्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी प्रसारित केल्या .रामायण, महाभारत या मालिकांनी ऐंशीच्या दशकामध्ये देश आणि विदेशामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेतील भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या भूमिका निभावणा- या कलाकारांना अक्षरशः देवाचे स्थान दिले गेले होते.
लोक त्यांना सार्वजनिक ठिकाणी सुद्धा देव मानून त्यांचे चरणस्पर्श करत असत. या मालिकेतील कलाकारांना आजही या भूमिकांमुळे ओळखले जाते .रामायण या मालिकेचे समाजमनावर असलेले गारुड लॉकडाउनच्या काळामध्ये जेव्हा ही मालिका पुन्हा प्रसारित केले गेली तेव्हा पुन्हा एकदा सिद्ध झाले कारण या मालिकेने गेल्या काही महिन्यांमध्ये विदेशामधील सुद्धा लोकप्रिय मालिकांना मिळणाऱ्या टीआरपी ला सुद्धा मागे टाकले व सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका रामायण ठरली आहे. या मालिकेच्या पुनर्प्रसारण सोबतच या मालिकेतील प्रमुख भूमिका निभावणा-या कलाकारांनी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले गेले. या कलाकारांच्या मुलाखती निरनिराळ्या चॅनेल्सवर प्रसिद्ध झाल्या.
रामायण मध्ये प्रमुख भूमिका निभावणाऱ्या सीता मातेच्या भूमिकेतील अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. दीपिका यांच्या मते या मालिकेने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत व प्रेक्षकांकडून खूप प्रेम सुद्धा सर्वच कलाकारांना मिळाले मात्र त्या वेळच्या भारत सरकारकडून मालिकेतील कलाकारांना योग्य तो सन्मान दिला गेला नाही व या कामाची फारशी दखल सरकारदरबारी घेतली गेली नाही.
त्यावेळी या मालिकेचे मानधन अगदी न सांगण्या इतके कमी होते. मात्र कोणत्याही कलाकाराने त्यावेळी पैशांकडे न बघता प्रेक्षकांच्या अपेक्षांना पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे अभिनय केला. त्यावेळी भारत सरकार कडून कोणत्याही सरकारी मानसन्मानासाठी या मालिकेतील एकाही कलाकाराची निवड केली गेली नाही ही खंत दीपिका चिखलिया यांना आहे.
मुलाखतीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की आता रामायण या मालिकेचे पुनर्प्रसारण केले गेले आहे व यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला आहे आणि एकंदरीतच या मालिकेची असलेली लोकप्रियता पाहता उशिरा का होईना पण या मालिकेतील कलाकारांना योग्य तो मानसन्मान सरकारने दिला पाहिजे. यासाठी कोणताही कलाकार पैशांची अपेक्षा धरत नाही मात्र जर भारत सरकारला रामायण या मालिकेने कला आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये काही भरीव कामगिरी केली आहे असे वाटत असेल तर या मालिकेतील कलाकारांची शिफारस ही पद्म सन्मानासाठी केली जावी अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.